बेकरी कामगारांवरील हल्ला प्रकरणी तिघांना ‘एलसीबी’ ने पकडले तर कुणाल भंडारीसह तिघांची न्यायालयाने केली जामिनावर सुटका

0
79

 

नगर – रामवाडी येथील घटनेनंतर शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाइपलाईन रस्त्यावरील एका बेकरीत चौघा युवकांवर झालेला प्राणघातक हल्ल्याचा या घटनेशी संबंध असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक करून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या कुणाल भंडारीसह तिघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा रामवाडी येथील किरकोळ हाणामारीच्या घटनेनंतर वर्चस्व दाखवण्यासाठी शहरात जमावासह दुचाकीवर रॅली काढून बाटल्या फेकल्याप्रकरणी बजरंग दलाच्या कुणाल भंडारीसह १५ ते २० जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कुणाल भंडारी, निखिल धंगेकर व उत्कर्ष गीते यांच्यावर सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे कारवाई करण्यात आली.

 

त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शयता व्यक्त करून तिघांना स्थानबद्ध करण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ती अमान्य केली. तिघांनाही जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान, वाणी नगर येथील बेकरीत त्याच रात्री चौघांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी जयेश लक्ष्मीकांत लसगरे (वय २१, रा. लोंढे मळा, कल्याण रोड, नगर), सोमनाथ माणिक शिंदे (वय २४, रा. शिवाजीनगर, तपोवन रोड, नगर), आकाश सुनील पवार (वय २१, रा. शिवनगर, पाईपलाईन रोड, नगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. शहरात दुचाकीवर फिरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या टोळीशी या तिघांचा संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. आणखी पाच आरोपी निष्पन्न झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

३०७ च्या गुन्ह्यात कुणाल भंडारीला वर्ग करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

दरम्यान, न्यायालयाने तिघांची जामिनावर सुटका केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी कुणाल भंडारी याला बेकरीतील हल्ला प्रकरणात संशयित म्हणून त्या गुन्ह्यात वर्ग करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने आधीच भंडारी याला अटक का केली नाही, असा सवाल उपस्थित केला. ठोस पुरावे अद्याप उपलब्ध नसल्याने अटक केली नाही, संशयित म्हणून त्याला ताब्यात घ्यायचे असल्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने ती मागणीही अमान्य केली.