खा.निलेश लंके यांची माहिती; मातोश्रीवर नगरच्या पदाधिकारी, शिवसैनिकांसोबत घेतली भेट
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधून करणार असल्याची माहिती खा.निलेश लंके यांनी दिली. या साठी आम्ही नगरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करणार असून नगर जिल्ह्यातील सर्व १२ जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे आपण ठाकरे यांना सांगितले असल्याचेही खा. लंके म्हणाले. खा. निलेश लंके यांनी शनिवारी (दि.२२) मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत नगर शहरातील व तालुयातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मातोश्री बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना होतीच, परंतु काही कारणास्तव त्यांना लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी येता न आल्याबद्दल खंतही त्यांनी बोलून दाखवल्याचे निलेश लंके यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाय आठवतं, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी माझ्या राजकारणाचा प्रवास सुरू केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख अशी सगळी पदं मी भुषविली. मी खासदार म्हणून निवडून आलो, याचा उद्धव ठाकरे यांनासुद्धा खूप आनंद झाला. महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्यामुळेही ते समाधानी आहेत, असे लंके यांनी सांगितले.