आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
92

नगर – अहमदनगर शहराच्या सावेडी भागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळच्या प्रसन्न वातावरणात झाला. यावेळी शाळेच्या माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी व सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शाळेच्या शिक्षिका विद्या पवार व क्रीडाशिक्षक संदीप दरंदले यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिके करून धडे दिले व योगदिनाविषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या विद्यार्थिनी कु. कृष्णा जाधव, रिचा पाटील व वेदिका ससे यांनी आदर्श सूर्य नमस्कार करून दाखविले. योगासनांनी मनाचे सामर्थ्य वाढते.

शरीरसंपत्ती ही धनसंपत्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण धनसंपत्ती आपल्याला पुन्हा पुन्हा संपादन करता येते, पण शारीरिक संपदा जर ढासळली तर परत मिळणे फार कठीण आहे. म्हणून सर्वांना व्यायाम करण्याचा सल्ला दिला. तसेच आपल्याला सुदृढ शरीर व निरामय आरोग्यासाठी नियमित योगासने करण्याची गरज आहे. निरोगी व तणावमुक्त राहण्यासाठी, समृध्दी व शांतता आणण्यासाठी रोज एक तास योगासनासाठी देणे आवश्यक आहे, असे शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. या दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. विश्वासराव आठरे पाटील व सर्व विश्वस्त यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. यावेळी मुख्याध्यापक, प्राथमिकच्या विभागप्रमुख, पर्यवेक्षिका, समन्वयक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.