ड्रेनेजच्या खड्‌ड्यात पडून एखाद्याचा जीव गेल्यावर महापालिका अधिकाऱ्यांचा ‘उद्या’ उजाडणार काय?

0
56

नगर – पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील ड्रेनेजलाईनची ठिकठिकाणी मोठी दुरावस्था झाली आहे. ड्रेनेजवरील झाकणे तुटली असून रस्त्यावर मोठमोठे भगदाड पडले आहेत. ठिकठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबून दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेक अपघात घडले असून लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच जिवीतास ड्रेनेजच्या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे असे असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असून अधिकारी अधून-मधून पाहणी करून जातात आणि उद्या दुरुस्ती करू असे सांगतात. मात्र मागील महिनाभरापासून अधिकार्‍यांची ‘उद्या’ उजाडलेलीच नसल्याने नरहरीनगरमधील कॉलनीतील रहिवाशांनी प्रशासनाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. गुलमोहोर रोडवरील नरहरी नगरमधील आनंद शाळेसमोरील कॉलनीतील रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेजलाईनची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजूने वाहणार्‍या या ड्रेनेजलाईनची झाकणे कधीच गायब झालेली आहेत. तात्पुरती सोय म्हणून त्यावर टाकण्यात आलेल्या फरशाही तुटल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. याच परिसरात खरवंडीकर संगीत विद्यालय आहे. या विद्यालयात अनेक लहान मुले शिकण्यासाठी येतात. रस्त्यावरून रहिवाशांची अहोरात्र ये-जा सुरू असते. अशावेळी ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो.

या कॉलनीतील रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असून वाहने चालविणे तर जीवघेणेच ठरू शकते. कारण आतापर्यंत अपघाताच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. सदरची ड्रेनेज तुंबल्यानंतर घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी रहिवाशांच्या घरासमोरून वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. येथे वास्तव्य करणारे रहिवाशी नरकयातना सहन करत आहेत. मोठा पाऊस झाल्यास गंभीर समस्या उद्भवण्याची शयता आहे. पावसाच्या पाण्याने ड्रेनेज भरल्यानंतर रस्त्यावरून जाताना खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हे शोधणेही अडचणीचे होणार असल्याने नागरिकांच्या जीवीतास धोका होऊ शकतो. येथील रहिवाशी असलेल्या विनित ओबेरॉय, रोहित जानवे, सुप्रिया देवी, मकरंद खरवंडीकर, धनश्री खरवंडीकर यांच्यासह नागरिकांनी ड्रेनेजच्या दुरावस्थेबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार कळविले आहे. त्याबाबत लेखी तक्रारीही दिल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

रस्ता व ड्रेनेजच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नरहरीनगरच्या कॉलनीतील रहिवाशी सोसताहेत ‘नरकयातना’ 

अधिकारी येऊन केवळ पाहणी करून जातात आणि उद्या करून देतो असे सांगतात. शुक्रवारी (दि. २१) सकाळीही महापालिकेचे अभियंता मनोज पारखे यांनी येथे येऊन पाहणी केली. सदर रस्त्याच्या कामावेळी ड्रेनेजलाईन दुरुस्त करून देऊ असे त्यांनी सांगितल्याचे रहिवाशी सांगतात. परंतु रस्त्याचे काम कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर अधिकारी देत नाहीत. रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल परंतु त्यापूर्वी एखादा मोठा पाऊस झाला आणि रस्त्यावरून पाणी वाहत राहिले अन् एखादी दुर्दैवी घटना घडल्यास अथवा ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत. प्रशासनाने केवळ भूलथापा देऊन बोळवण करू नये. ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करून नागरिकांच्या जीवीताचे रक्षण करावे अन्यथा आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा रहिवाशांकडून देण्यात आला आहे.