एस टी बस प्रवासात महिलेचे दागिने व रोख रकमेची चोरी

0
103

 

नगर – एस.टी. बस प्रवासा दरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला जात असल्याच्या घटना वारंवार घडत असून आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. मनमाडहून नगरकडे येण्यासाठी एस टी बस मध्ये प्रवास करत असलेल्या महिलेचे पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबत सीमा वसंत उगलमुगले (रा. मनमाड, ता. नांदगाव, नाशिक) यांनी गुरुवारी (दि.२०) सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी उगलमुगले या बुधवारी (दि.१९) सायंकाळी मनमाडहून नगर कडे येण्यासाठी मनमाड बसस्थानकातून एस टी बस मध्ये बसल्या होत्या. प्रवासात राहुरी ते नगर एमआयडीसी तील सह्याद्री चौक या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मधील दागिने व रोख रक्कम चोरली. सह्याद्री चौकात बसमधून उतरल्यावर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.