आनंदऋषीजी हॉस्पिटलचे निस्वार्थपणे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद : महेंद्र लोढा

0
54

पोटाचे विकार व जनरल शास्त्रक्रिया शिबिरात प्रतिसाद

नगर – समाजातील आर्थिक दुर्बल घटक व गरजु रुग्णांसाठी शिबिराचे माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवाकार्य कौतुकास्पद आहे. समाजातील गरजू रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ मिळावा. यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य तळमळीने कार्य करीत आहेत. तसेच आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सर्व डॉटर्स, नर्सेस सर्व स्टाफ निस्वार्थ सेवा देत आहेत. जैन सोशल फेडरेशनने शिबिराच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला दिली आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे निस्वार्थपणे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक महेंद्र लोढा यांनी केले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे लोढा परिवाराच्यावतीने पोटाचे विकार व जनरल शास्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आयोजक महेंद्र लोढा व लोढा परिवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सविता लोढा, निखिलेंद्र लोढा, मनीषा लोढा, सुजाता लोढा, राखी लोढा, दीपिका लोढा, कोमल लोढा, परेश लोढा, स्मिता लोढा तसेच जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, बाबु लोढा, डॉ.वसंत कटारिया, डॉ. प्रकाश कांकरिया, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी शिबिराचे तज्ञ डॉ.राहुल कांडेकर, डॉ.भास्कर जाधव, डॉ.राम पांडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ.प्रकाश कांकरिया म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटल या आरोग्य मंदिराच्या उभारणीला २५ वर्षे पूर्ण होत आहे. या आरोग्य मंदिराच्या उभारणी पासून लोढा परिवाराचे सातत्याने सहकार्य मिळत आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातून रुग्ण येत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हृदयशस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी जैन सोशल फेडरेशनवर दाखविलेल्या विश्वासामुळे हॉस्पिटलचे सेवा कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच आनंदऋषीजी नेत्रालय विभागामार्फत दररोज शंभरहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. या शिबिरामध्ये मोफत तपासणी व सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहेत.

या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. राखी लोढा म्हणाल्या, आचार्य आनंदऋषीजी यांच्या आशीर्वादामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोठे सेवा कार्य सुरू आहे. सध्या वैद्यकीय सेवा महाग झाली आहे. न परवडणारा औषधाचा खर्च यामुळे अनेक रुग्ण वंचित राहत असतात.परंतु आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होणार्‍या शिबिरांमुळे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळत आहे. नव्यानेच रुजू झालेले डॉ.राहुल कांडेकर म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या व बदलत्या जीवनशैलीत अनेकांना पोटाचे विकार समस्या भेडसावत आहेत. शिबिराच्या माध्यमातून पोटाचे विकार व जनरल शस्त्रक्रिया मोफत तपासणी व सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. शिबिरात १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.