आंनद योग केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, चौका-चौकात केलेल्या योगाच्या विविध आसनांनी वेधले लक्ष
नगर – वर्षभर नागरिकांना योगाचे धडे देऊन योग-प्राणायामचा प्रचार प्रसार करणार्या आंनद योग केंद्राच्या वतीने सावेडीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिडशे साधकांनी शुभमंगल कार्यालयात योगसाधना केली. तर योगाच्या जागृतीसाठी विद्यार्थ्यांसह साधकांनी परिसरातून प्रभात योग रॅली काढली. चौका-चौकात सादर करण्यात आलेल्या योगाच्या विविध आसनांची प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. योगामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले रहाते. जीवन आंनदमय, व्याधीमुक्त बनते. निरोगी आरोग्य व तणावमुक्तीसाठी योग, प्राणायाम व ध्यानधारणा हे सर्वोत्तम पर्याय असल्याचे केंद्र प्रमुख दिलीप कटारिया यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावेडी परिसरातून निघालेल्या योग रॅलीमध्ये रेणाविकर प्रशाला, केशवराव गाडीलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. योगाबद्दल जागृतीचे माहिती फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी योग करा निरोगी रहा! च्या घोषणा दिल्या.
भिस्तबाग चौकात आसनांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात योग साधकांना दाद दिली. सर्वांनी दररोज नियमितपणे योगाभ्यास करावा, म्हणून आंनद योग केंद्र अनेक वर्षांपासून सावेडी परिसरात योग वर्ग घेत आहे. या केंद्रातून अनेक योगशिक्षक तयार झाले असून, ते योगाचा प्रचार, प्रसार करीत आहेत. कार्यक्रमासाठी रेणावीकर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, केशवराव गाडीलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक गायकवाड, जयश्री देशपांडे, डाके सर यांचे सहकार्य लाभले. योग शिबिरात चंद्रशेखर सप्तर्षी, प्रशांत बिहाणी, दिलीप पवार, राजेंद्र कलापुरे, उषा पवार, सोनाली जाधववार, स्वाती वाळुंजकर, डॉ. मनिषा जायभाय, प्राची शिंदे, रेखा हाडोळे, अपेक्षा संकलेचा, श्लोका रिक्कल, पूजा ठमके यांनी आसनांची सुंदर, आदर्श प्रात्यक्षिके सादर केली. निहाल कटारिया, नरेंद्र गांधी, सिद्ध चोरडिया यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.