नगर – रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा वाजवून वृद्ध दाम्पत्याला झोपेतून उठवत बेदम मारहाण केली व त्यांच्या घरातील ५० हजारांची रोकड आणि ४३ हजारांचे सोन्याचे दागिने असा ९३ हजारांचा ऐवज अनोळखी ४ चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील सारोळा कासार शिवारात दरेमळा येथे बुधवारी (दि.१९) पहाटे घडली आहे. याबाबत सुगंधा कुंडलिक कडूस (वय ६०, रा. दरेमळा, सारोळा कासार, ता. नगर) यांनी दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कडूस यांची दरेमळा परिसरात डोंगराच्या कडेला एकांती वस्ती आहे. तेथे दोघे पती पत्नीच गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. मंगळवारी (दि.१८) रात्री ते जेवण करून घराचा दरवाजा बंद करून झोपले असताना बुधवारी (दि.१९) पहाटे १ च्या सुमारास अनोळखी ३ ते ४ चोरटे त्यांच्या वस्तीवर आले. त्यांनी कडूस यांना आवाज देत दरवाजा वाजवून उठवले. रात्रीच्या वेळी कोण हाक मारत आहे, हे पाहण्यासाठी फिर्यादी सुगंधा कडूस यांनी दरवाजा उघडला असता अचानक अनोळखी ३ – ४ चोरटे घरात घुसले. त्यांनी सुगंधा व त्यांचे पती कुंडलिक कडूस यांना दमबाजी करत मारहाण सुरु केली. तसेच घरातील पैसे व दागिने काढुन देण्यासाठी धमकावले.
नगर तालुयातील घटना; अनोळखी ४ चोरट्यांवर गुन्हा दाखल
चोरट्यांच्या मारहाणीच्या भीतीने त्यांनी आदल्या दिवशी दुपारी गावातील बँकेतून दवाखाना खर्चासाठी तसेच शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे व खते घेण्यासाठी काढुन आणलेले ५० हजार रुपये, तसेच सुगंधा कडूस यांच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील कर्णफुले, कुडके हे दागिने असा ९३ हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे पती पत्नी जखमी झालेले असून त्यांना मुक्का मार लागलेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत सुगंधा कडूस यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात ३-४ चोरट्यांविरुद्ध भा. दं. वि. कलम ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग हे करत आहेत.