जिल्हा वाचनालयाने समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम केले : आ. संग्राम जगताप

0
21

नगर – शहरांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे, सावेडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मनपाच्या माध्यमातून सावेडी एल.आय.सी. कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले आहे याठिकाणी भव्यदिव्य इमारत उभी राहिली आहे. या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन लेखक, कवी घडले जातील, जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम केले आहे. प्रा. शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्रा. आर. जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आ.संग्राम जगताप यांचा सत्कार झाला.

यावेळी अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सावेडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी, राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत येलुलकर, प्रसन्नप्रभा मोडक, माजी नगरसेवक अजिंय बोरकर, शिल्पा रसाळ, अभिजीत कुलकर्णी, महेश देशमुख, अंजली देशमुख, राजू देशमुख, राहुल तांबोळी, मिलिंद कुलकर्णी, आरती पटवर्धन, सचिन जगताप आदी उपस्थित होते. अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले की, वाचन संस्कृतीचे संवर्धन आणि तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी या हेतूने जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्रा. आर. जी कुलकर्णी सभागृह उभे केले आहे. याचा लोकार्पण सोहळा लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाला आहे. ही वास्तू उभी राहण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य असून महापालिकेच्या माध्यमातून मोठा भूखंड उपलब्ध करून दिला आहे, तसेच संरक्षण भिंतीचे काम देखील मार्गी लावले आहे. नगर शहरामध्ये सुंदर वास्तू उभी राहत वैभवात भर टाकली आहे. या निमित्त आ. संग्राम जगताप यांचे जिल्हा वाचनालयातर्फे स्वागत केले आहे. इमारतीच्या कामासाठी देशमुख व कुलकर्णी कुटुंबाचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.