८० गोण्या प्लॅस्टिकचा कचरा केला गोळा | ‘ट्रेकॅम्प’चा पुढाकार, अनेक संस्थांचा सहभाग
नगर – सकाळचे आल्हाददायक वातावरण… झाडाझुडप्यांनी वेढलेली दाट दरी-डोंगर… त्यात स्वच्छता करीत असलेल्या लहान विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा लवाजमा… निमित्त होते ट्रेकॅम्प संस्थेने आयोजित केलेल्या ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’चे, अर्थात स्वच्छता मोहिमेचे. प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे ‘ट्रेकॅम्प’चे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या संकल्पनेतून प्लॉगिंग ड्राईव्ह हा उपक्रम गेल्या अनेक दिवसांपासून नगरमध्ये राबविला जात आहे. नगरजवळील पर्यटनस्थळाच्या परिसरात साठलेला प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून तो परिसर स्वच्छ करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गतच ट्रेकॅम्प संस्थेच्या पुढाकारातून नगरमधील विविध संस्थांच्या सहकार्याने डोंगरगण येथील आनंद दरीत स्वच्छता मोहीम राबविली गेली. त्यात सुमारे ८० गोण्या प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत लहान मुले व महिलांचा मोठा सहभाग होता. सकाळी सहा वाजता सर्वजण एकत्रितपणे वांबोरी घाटाकडे रवाना झाला. घाटाखालील गणेश मंदिराजवळ जमलेल्या सुमारे ८०० निसर्गप्रेमींचे विविध गट करून स्वच्छता मोहिमेविषयी सूचना देण्यात आल्या. सुरक्षिततेसाठी सर्वांना हातमोजे देण्यात आले.
डोंगर, दरीत भटकंती करत तेथे पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रॅपर आदी गोळा करून गोण्यांमध्ये भरले जात होते. नंतर दरीतील एका तलावाच्या काठी सर्वजण जमा झाले. नंतर तेथे भेळ व चुलीवरील कॉफीचा आनंद घेत सर्वांनी सेल्फी, फोटो काढले. पर्यटनाबरोबरच स्वच्छता केल्याचे समाधान प्रत्येकाच्याच चेहर्यावर दिसत होते. या मोहिमेत आयकॉन पब्लिक स्कूल, नालंदा स्कूल, विझार्ड कॉम्प्युटर्स, आयएमए लेडीज डॉटर विंग, गॅलेसी स्कूल, फिजिसवाला, अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज, जैन ओसवाल संघ, अहमदनगर सायलिस्ट असोसिएशन, आयएसडीटी कॉलेज या संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या प्रतिनिधींचा या वेळी सन्मान करण्यात आला. उपक्रमासाठी ट्रेकॅम्पच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. गोळा केलेल्या कचर्याची वाहतूक व विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ‘सर्व अॅप’च्या व्हॅनने पार पाडली. सर्पमित्र हर्षल कटारिया यांनी या वेळी उपस्थितांना सापांची माहिती दिली. या वेळी लाहोटी म्हणाले की, प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना पर्यटनस्थळी प्लॅस्टिकचा कचरा होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहील.