राज्य सरकारकडून ‘ओबीसी समाजा’वर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही : संजय गाते

0
93

जालना येथील आमरण उपोषणास नगर जिल्हा ओबीसी व्हिजेएनटी जन मोर्चाचा पाठिंबा

नगर – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात ओबीसी समाजामध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असा समज जातो की ओबीसींच्या आरक्षणामध्ये कोणाचे तरी अतिक्रमण होते का? हे अतिक्रमण होऊ नये. ओबीसी समाजाला कुठेतरी शाश्वती मिळावी. यासाठी ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे आमरण उपोषण करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी वारंवार सांगितले आहे की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरी विषयक आरक्षण देऊ आणि ते दिले पण. परंतु सगे सोयरे यांचा अध्यादेश काढून ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय. तो अन्याय भाजपा ओबीसी मोर्चा कदापि सहन करणार नाही. निश्चित ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. हा विश्वास आमच्या नेत्यांबद्दल वाटतो. प्रा. हाके व वाघमारे यांच्या भावना जाणून घेऊन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्यात येतील. सरकार निश्चितच ओबीसींच्या बाबतीत न्याय करेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले आहे.

जालना, अंबड तालुयातील वडगोद्री या ठिकाणी प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे ओबीसी भटया विमुक्त मोर्चाच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषणास पाचवा दिवस आहे. यावेळी संजय गाते यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच अहिल्यानगरचे ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले. याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे माऊली गायकवाड, भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष, रमेश सानप, गोरक्ष गावडे, विनोद पुंड, निलेश चिपाडे, रोहित पठारे, मनोज भुजबळ, जामखेड जायभायवाडीचे सरपंच सुभाष जायभाय, उपसरपंच भास्कर जायभाय, माजी सरपंच श्रीराम जायभाय, रामदास जायभाय, राजेंद्र जाधवर आदी उपस्थित होते. बाळासाहेब भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागु नये. यासाठी नगरमध्ये महाएल्गार मेळाव्याला प्रा.लक्ष्मण हाके यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले होते. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी नगर जिल्हा ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाच्या वतीने पाठिंबाचे पत्र देण्यात आले आहे.