सेमिनार घेत टोळीकडून अनेकांची फसवणूक
नगर – शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर मधील अनेकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणारे आणखी एक रॅकेट उघडकीस आले आहे. चौघांच्या टोळीने शहरात शेअर ट्रेडिंग बाबत सेमिनार आयोजित करून अनेकांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या कडून गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपये घेवून पुणे येथे सुरु केलेले कार्यालय बंद करत पोबारा केला आहे. याप्रकरणी एका गुंतवणूकदाराने मंगळवारी (दि.१८) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून चौघांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एच आर श्रीकांत, धर्मेंद्रसिंग सेगर (दोघे रा. भोपाल, मध्य प्रदेश), दिनेश योगेश भटनागर (रा. पिंपळे निलख, पुणे), साजिद शेख (रा. कोंढवा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत संदीप बाबुराव कोठुळे (रा. साखर कारखाना कामगार वसाहत, श्री शिवाजीनगर, राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी नगर शहरात डिसेंबर २०२१ मध्ये शेअर मार्केट व फोरेस मार्केट बाबत सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनार मध्ये फिर्यादी कोठुळे यांच्या सह शहर व जिल्ह्यातून अनेक जण सहभागी झाले होते. आरोपींनी सुरुवातीला सर्वांना शेअर ट्रेडिंग बाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या कंपनीचे एक कार्यालयही पुणे येथे सुरु करून सर्वांना त्याचा पत्ता दिला.
फिर्यादी व इतरांना शेअर ट्रेडिंग बाबत माहिती देत कशाप्रकारे गुंतवणूक केल्यास अधिक नफा भेटू शकेल अशी माहिती देत सर्वांचा विश्वास संपादन केला. या चौघांवर विश्वास बसल्याने फिर्यादी कोठुळे यांनी या आरोपींना वेळोवेळी ऑनलाइन सुमारे ११ लाख २० हजार रुपये पाठविले. कोठुळे यांच्या प्रमाणेच अनेक गुंतवणूकदारांनी या टोळीला लाखो रुपये दिले. मात्र अनेक दिवस उलटूनही आरोपींकडून नफा तर सोडा गुंतवलेले पैसेही मिळाले नाहीत. अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये जमा केल्यावर या टोळीने पुणे मधील कार्यालयही अचानक बंद करून पोबारा केला. अनेक दिवस त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत गुंतवलेले पैसे परत मिळविण्यासाठी कोठुळे यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे कोठुळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.१८) रात्री फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी चौघांच्या टोळी विरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, १२० (ब) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण कायदा कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत.
नगरमध्ये आठवडाभरात ३ गुन्हे दाखल
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे ३ गुन्हे या आठवडाभरात नगर शहरात दाखल झाले आहे. यातील २ गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत. शहरातील व्यावसायिक राजीव अनंत सहस्त्रबुध्दे (वय ५३, रा. सिध्दीविनायक सोसायटी, सावेडी) यांची १५ लाख ५५ हजारांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. त्या पाठोपाठ प्रकाश दत्तात्रय कुकडे (रा. शिवम विहार, शिंदे मळा, सावेडी) या सेवानिवृत्त व्यक्तीची ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता संदीप बाबुराव कोठुळे यांची ११ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहराबरोबरच शेवगाव मध्येही अशाच पद्धतीने अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली असून त्या पैकी एक गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. तेथे गुंतवणूकदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते.