नगर – बेकरीत झोपलेल्या तिघा कामगारांवर ६ ते ७ जणांच्या जमावाने तलवारीने वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० च्या सुमारास सावेडी उपनगरातील वाणीनगर येथील बजरंग शाळेजवळ असलेल्या फाईव्हस्टार बेकरीत घडली. या हल्ल्यात मोहम्मद जैद अन्सारी (वय १८, रा. बीजनोर, उत्तरप्रदेश), तसेच त्याचे सहकारी नाजीम कासार, कासीम कासार हे तिघे जण जखमी झाले आहेत. तिघेही बेकरीत झोपलेले असताना अनोळखी ६ ते ७ जणांनी लाकडी दांडके, तलवार घेऊन येत त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ व आर्म अॅट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.