रस्ते दुरुस्ती करण्यासाठी बाजारपेठेत सह्यांची मोहीम

0
32

दुरावस्थेबाबत उपाययोजना करा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन : शिवसेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

नगर – कापड बाजार ते सर्जेपुरा रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने परिसरातील नागरिकांची सह्यांची मोहिम राबवून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, रवी वाकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, परेश लोखंडे, गौरव ढोणे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे, दिपक भोसले, शाम कोके, अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, अण्णा घोलप, बंटी खैरे, संतोष डमाळे, डॉ.श्रीकांत चेमटे, अभिजित अष्टेकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, नगर शहराच्या मध्यवर्ती भागतील कापड बाजार ते सर्जेपुरा ते लालटाकी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. अनेक छोट-मोठे अपघात या ठिकाणी होत आहे. नगरच्या बाजारपेठेत जिल्ह्याच्या काना कोपर्‍यातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. तरी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे मनपा दुर्लक्ष करत आहे.

मनपाला वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, जिल्ह्याची बाजारपेठ म्हणून कापड बाजार ओळखला जातो. या भागातील दुकानदार, व्यापारी, रहिवासी मोठ्या प्रमाणात मनपाचा कर भरत आहेत. परंतु मनपा येथील समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कापड बाजार ते सर्जेपुरा ते लालटाकी रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याबाबत वेळोवेळी शिवसेनेने पाठपुरावा केला परंतु कोणतीही कार्यवाही होत नाही. आता नागरिक व व्यापारी रस्त्यांवर उतरुन सह्यांची मोहिम हाती घेऊन या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. या उपरही जर मनपाने काही उपाय योजना केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असे सांगितले.