मिनी बँकेचे सेंटर फोडून ६० हजार रुपयांची रोकड पळविली

0
98

चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात झाला कैद, पोलिसांकडून शोध सुरु 

नगर – युनियन बँकेचे मिनी बँक सेंटर असलेल्या गाळ्यातील आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने गाळ्यातील ड्रॉवर मध्ये ठेवलेली ६० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील रुईछत्तीशी गावात भरदिवसा घडली आहे. याबाबत मिनी बँक सेंटर चालक अजय गोरखनाथ शेंडगे (रा. मठ पिंपरी, ता. नगर) यांनी मंगळवारी (दि.१८) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रुईछत्तीशी गावात एका गाळ्यात युनियन बँकेचे मिनी बँक सेंटर चालवतात. त्या द्वारे ते बँकेच्या खातेदारांचे पैशांचे व्यवहार करत असतात.

रविवारी (दि.१६) दुपारी १२.३० ते ३.२० या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या सेंटर मधील आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आणि आतमधील टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यात ठेवलेली ६० हजारांची रोकड चोरून नेली. चोरीची ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी नगर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच गाळ्यातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात एक चोरटा चोरी करताना दिसून आला. मात्र सदर फुटेज अस्पष्ट असल्याने त्या गाळ्याच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी सुरु केली आहे. या प्रकरणी अजय शेंडगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.