सिद्धार्थनगर परिसरातील घटना; खुनानंतर आरोपी झाला पसार
नगर – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा चाकू व हत्याराने वार करून खून केल्याची घटना सिध्दार्थनगर- मध्ये घडली. रेवती ऊर्फ राणी संदीप सोनवणे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती संदीप ऊर्फ कुंदन राधाजी सोनवणे याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रेवतीचे वडील बाळु केशव साठे (वय ६६, रा. बुर्हाणनगर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप व रेवती यांच्या विवाहाला १८ वर्ष पूर्व झाली असून त्यांना दोन मुली आहेत.
दरम्यान संदीप नेहमी रेवतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. रेवती याबाबतची तक्रार वडिलांकडे करायची व ते तिला माहेरी घेऊन येत होते. ६ जून रोजी रात्री संदीपने रेवतीसह त्याच्या दोन्ही मुलींना मारहाण करून भर पावसात घराबाहेर काढून दिले होते. त्या तिघी नातेवाईक वैरागर यांच्याकडे गेल्या. तेथून त्यांनी वडील बाळू साठे यांना माहिती दिली. साठे यांनी तिघींना एमआयडीसीतील त्यांच्या मेव्हणीकडे ठेवले. तेथे त्या दोन ते तीन दिवस राहिल्या. नंतर साठे यांनी त्यांना घरी बुर्हाणनगर येथे आणले. त्यानंतर संदीप सासरी बुर्हाणनगरला आला व तेथेच राहू लागला. त्याने मारहाण केल्याची चूक कबूल करून पुन्हा असे करणार नाही, त्यांना माझ्यासोबत पाठवा अशी विनवणी केली. साठे यांनी देखील त्याला समज दिली.
दरम्यान सोमवारी (दि.१७) सकाळी साडेआठ वाजता संदीप याने सासरे साठे यांची दुचाकी घेतली व तो पत्नी रेवतीसोबत घरी सिध्दार्थनगर येथे आला. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.१८) दुपारी १२ वाजाता मुलीला भेटण्यासाठी व दुचाकी आणण्यासाठी साठे मुलीच्या घरी आले असता त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तेथे दांडी नसलेला चाकू होता. साठे यांनी नातेवाईक व तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेवतीला रूग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले. पोलिसांनी संदीप सोनवणे विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.