डोके विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
नगर – शाळेतून मिळालेले संस्कार हे जीवनात नेहमीच मार्गदर्शक असतात. शाळा ही आपल्या जीवनाला आकार देणारी संस्था आहे. आजचा विद्यार्थी ही भविष्यातील देशाचा नागरिक असल्याने तो सक्षम व सुदृढ असणे गरजेचे आहे. शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध योजना राबवत आहेत. या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन आपली प्रगती साधली पाहिजे. शिक्षक आणि पालकांच्या एकत्रित प्रयत्नाने विद्यार्थी घडत असतो. आज विद्यार्थ्यांना मिळालेल्या पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचा उपयोग करुन चांगला अभ्यास करावा. विशेषत: मोबाईलचा उपयोग गरजेपुरताच करावा शाळे मधे लक्ष द्यावे शिक्षणासाठी मोबाईलचा वापर करावा असे प्रतिपादन जि. प.च्या माजी सदस्या माई पानसंबळ यांनी केले. निर्मलनगर येथील डोके विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे जि.प.माजी सदस्या माई पानसंबळ, अंगणवाडी सेविका सुनिता काळभोर, मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे, ज्योती पवार, सुजाता कर्डिले, मंजू नवगिरे, राणी राऊत, संजोत बर्वे, भरत जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता काळभोर म्हणाल्या, डोके विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी चांगले उपक्रम राबविले जात आहेत. सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवत आहे. यावेळी मुख्याध्यापिका रिबेक म्हणाल्या, संस्था चालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना सर्वोतोपरि सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळवून दिला जात आहे. अभ्यासाबरोबरच इतर स्पर्धा, परिक्षांसाठीही विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येत असल्याने विद्यार्थीही यश संपादन करत आहेत. त्यामुळे शाळेच्या लौकिकात भर पडत आहे. आज विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पदेऊन स्वागत केले आहे, त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तके वाटप करुन वर्षभरातील उपक्रमातून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन मंदाकिनी पांडूळे यांनी केले तर आभार आशा धामणे यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक उपस्थित होते. नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदून गेले होते.