कंटेनर उलटून अपघात; एकाचा मृत्यू, १ जखमी; छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प

0
72

नगर – नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर तालुयातील इमामपूर घाटात मंगळवारी (दि. १८) सकाळी १०.१५ च्या सुमारास कंटेनर रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर खाली सापडून दुचाकीस्वार ठार झाला तर त्याची मुलगी जखमी झाली आहे. डांबर भरलेले पिंप असलेला कंटेनर घाटात रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने दुपारी उशिरा पर्यंत या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघातात नेवासे तालुयातील खरवंडी येथील अनिल दगडू फाटके (वय ४०) हे मयत झाले असून त्यांची मुलगी जखमी झाली आहे. तसेच अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, डांबराने भरलेली पिंप घेवून एक कंटेनर छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. इमामपूर घाटात उताराला कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व तो एका टाटा इंट्रा या माल वाहतूक करणार्‍या वाहनाला धडकला.

त्यामुळे टाटा इंट्रा वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले तर कंटेनरही रस्त्यातच उलटून आडवा झाला. त्याच वेळी नेवासा तालुयातील खरवंडी येथून मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी नगरकडे मोटारसायकल वर येत असलेले अनिल दगडू फाटके यांच्या मोटारसायकलला कंटेनरची धडक बसली. त्यामुळे ते गंभीर जखमी होवून मयत झाले. तर मोटारसायकल वर पाठीमागे बसलेली त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. या अपघाताची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक अपघातस्थळी पोहोचले. तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करुन जखमी मुलीला आणि तिच्या वडिलांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आलं.

या अपघाता दरम्यान इमामपूर घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. कंटेनर रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने आणि त्यात डांबराने भरलेले पिंप असल्याने ते रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम बराच वेळ सुरु होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. फाटके यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.