महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ‘ओबीसी’तून किरण पतके बिनविरोध

0
81

नगर – भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या महिला राखीव च्या २ जागा बिनविरोध झाल्यानंतर मंगळवारी (दि.१८) इतर मागास प्रवर्गातही दाखल असलेल्या २ अर्जांपैकी सुदाम तुळशीराम गांधले यांनी अर्ज मागे घेतल्याने किरण पतके यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या महिला राखीव मतदार संघात वैशाली वर्धमान बोरा व अंजली नितीन शिंगवी यांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे. तर इतर मागास प्रवर्गातून किरण पतके यांची निवड झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. संस्थेच्या सर्वसाधारण मतदार संघात १२ जागांसाठी १८ अर्ज दाखल होते.

 

त्यातील बिपिनचंद्र बन्सीलाल लुणिया, प्रमोद माणचंद मुनोत, विनोद चंपालाल पोखरणा या तिघांनी शुक्रवारी माघार घेतली आहे. त्यामुळे आता १२ जागांसाठी १५ जणांचे अर्ज शिल्लक राहिले होते. मंगळवारी रतिलाल सिमरतमल गुगळे यांनी माघार घेतल्याने १२ जागांसाठी १४ अर्ज शिल्लक राहिले आहेत. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २७ जून पर्यंत उमेदवारांना माघारीची मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची यादी २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे काम पाहत असून त्यांना संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र मेहेर हे सहाय्य करत आहेत.