नगर- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) सोमवारी (दि.१७ जून) साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी ९:३० वाजता ईदची नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली.
ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानसह शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसर्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.