बँकेच्या व्यवस्थापकाने खातेदाराची केली ३६ लाख रुपयांची फसवणूक

0
41

नगर – बँकेच्या खातेदाराचे ओ डी खाते थकीत असतानाही त्यात वेळो वेळी वाढ करत आणि खातेदाराची सही नसलेले चेक ही वठवून त्याच्या खात्यातून वेळोवेळी सुमारे ३६ लाख रुपये परस्पर काढुन घेत बँकेच्या व्यवस्थापकाने काही कर्मचार्‍यांच्या मदतीने खातेदाराची तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या नगरमधील बारातोटी कारंजा शाखेत हा प्रकार घडला असून बँकेच्या व्यव्स्थापकासह कर्मचार्‍यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय सुदाम रोकडे (रा. ओझस अपार्टमेंट, कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ, गुलमोहर रोड) यांनी रविवारी (दि.१६) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रोकडे यांचे सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या नगरमधील बारातोटी कारंजा शाखेत खाते आहे. या शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक प्रकाश दत्तात्रय सावंत (रा. सेन्ट्रल बँक कॉलनी, सूतगिरणी रोड, श्रीरामपूर) यांनी सन २०१३ ते २०१९ या कालावधीत फिर्यादी यांच्या बँक खात्यातून त्यांचे काही सही असलेले तर काही सही नसलेले चेक स्वताच्या फायद्यासाठी काही कर्मचार्‍यांशी संगनमत करून वठवून त्यातून रक्कम काढुन घेतली. विशेष म्हणजे ओ डी खाते थकबाकीत असताना त्याची वारंवार मर्यादा वाढवून हे पैसे काढण्यात आले.

व्यवस्थापकासह कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल; नगरच्या सेन्ट्रल बँकेतील प्रकार 

फिर्यादीचे कर्ज खाते चालू असताना त्यांना खोटे व बनावट ना हरकत प्रमाणपत्र देवून त्यांचा विश्वास संपादन करून हा गैरप्रकार केला. ही बाब फिर्यादी रोकडे यांना सम जल्यावर त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारची फिर्यादी रोकडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी दुपारी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या बारातोटी कारंजा शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक प्रकाश दत्तात्रय सावंत व त्यांना सहाय्य करणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत.