युएसएमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नगर – इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सब ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग अॅण्ड नॅशनल डेडलिफ्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत देशभरातून दोन हजारपेक्षा अधिक महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. मिश्रा यांनी स्पर्धेत सहभागी होऊन पॉवरलिफ्टिंग मध्ये ५७ किलो वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करुन पदकाची कमाई केली. त्यांना सुवर्ण पदक व चषकाने सन्मानित करण्यात आले. युएसए मध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय सब ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत मिश्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशाबद्दल अॅमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव संतोष शिंदे व राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.