धारदार शस्त्रे घेऊन शहरात दहशत करणारे आणखी दोघे पकडले

0
33

तलवार, कोयता, चॉपर जप्त; तोफखाना व कोतवाली पोलिसांची कारवाई 

नगर – धारदार शस्त्रे घेऊन शहरात दहशत करणार्यांवर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शस्त्राच्या धाक दाखवून लुटमार करणे, परिसरात दहशत करणे, प्राणघातक हल्ला करण्यासाठी सर्रास धारदार शस्त्रांचा वापर केला जात आहे. शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने एकाला तलवारीसह पकडल्या नंतर तोफखाना व कोतवाली पोलिसांनी शस्त्र बाळगणार्‍या आणखी दोघांना पकडून त्यांच्याकडून तलवार, कोयता, चॉपर अशी शस्त्र जप्त केली आहेत. शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रस्त्यावर रिमांड होम समोर हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण करणार्या राजेंद्र गोलासिंग टाक (वय ३१,रा. संजयनगर, काटवन खंडोबा) याला शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१४) रात्री १०.१५ च्या सुमारास पकडले होते.

त्यानंतर तपोवन रस्त्यावरील युनिटी ग्राउंड येथे एक व्यक्ती हातामध्ये तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने सदर ठिकाणाहून उत्कर्ष सुनील गाडे (वय २७, रा. शिवनगर, सावेडी) यास पकडले. त्याच्याकडे तलवार व चॉपर मिळून आले. ते जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गाडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व आर्म अ‍ॅूट कलमानुसार गुन्हा दाखल असून तो त्या गुन्ह्यात पसार होता. रेल्वे पुलाजवळ, कायनेटीक चौक येथे एक व्यक्ती हातामध्ये कोयता घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने सदर ठिकाणी संशयित व्यक्तीला पकडले. त्याने त्याचे नाव अक्षय भगवान खंडागळे (वय २४, रा. अचानक चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) असे सांगितले. त्याच्या ताब्यात धारदार लोखंडी कोयता मिळून आला. तो पोलिसांनी जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.