विसापूर तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची महाआघाडीची मागणी

0
35

नगर – विसापूर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे घोसपुरी पाणी पुरवठा योजनेतून गढूळ पाणी येत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे. त्यामुळे विसापूर तलावात कुकडीचे पाणी पिण्यासाठी सोडावे, अशी मागणी नगर तालुका महाआघाडीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. विसापूर तलावात सध्या पाणीसाठा अत्यंत कमी आहे तरी त्यामुळे घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अत्यंत गढूळ व पिण्यास अयोग्य पाणी पुरवठा होत आहे. खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळकी, खडकी, सारोळा कासार, घोसपुरी, हिवरे झरे, वडगाव, तांदळी, जाधववाडी या गावांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटाचे, साथीचे आजार होण्याचा मोठा धोका आहे. सध्या कुकडीचे आवर्तन सुरू आहे. तरी विसापूर तलावात तातडीने गढूळ पाणी येणार नाही, यासाठी कुकडीचे पाणी त्वरित सोडावे किंवा सदर गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत; अन्यथा पुढील आठवड्यात नगर-दौंड रस्त्यावर महिला भगिनींसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना नगर तालुका महाआघाडीच्या वतीने शुक्रवारी देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, पोपट निमसे, राम भालसिंग, कोठुळे मेजर, जनार्धन माने, प्रवीण भाऊसाहेब काळे आदी उपस्थित होते.