कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
49

नगर – व्यापारी, व्यवसायिक आणि नागरिकांनी आवाज उठविल्यानंतरही शहरातील कचर्‍या प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शहराच्या विविध भागात कचर्‍याचे ढिगारे साठले आहेत. कचरा उचलण्याचे काम सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनत असून ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेत भर पडत आहे. या कचर्‍याच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी महापालिकेने खासगी ठेकेदार संस्थेची नेमणूक केली आहे. तथापी या ठेकेदाराचे बील महापालिकेकडे थकीत असल्याने कचरा उचलण्याचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे शहराच्या प्रमुख बाजारपेठेसह विविध भागात कचर्‍याचे ढिगारे साठले आहेत. या कचर्‍यावर मोकाट जनावरे फिरत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. जनावरांच्या मलमुत्रामुळे आणि पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सदर कचर्‍याचे ढिगारे सडले असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. ठिकठिकाणी कचर्‍याच्या ढिगार्‍यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कचर्‍याचे ढिगारे रोगराईला आमंत्रण देत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे जलजन्य आजाराबरोबरच साथरोगांचाही प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी कचर्‍याची विल्हेवाट लावून स्वच्छता करणे आवश्यक असते. मात्र शहरात सध्या वेगळेच चित्र असून पावसाळ्याच्या तोंडावरच कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शनिवारी (दि. १५) सकाळीही हातमपुरा, बंगाल चौकी, बाबा बंगाली चौक, रिव्हेन्यू सोसायटी या भागात कचर्‍याचे मोठ्या प्रमाणात ढिगारे साचलेले होते. कचर्‍याच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कचर्‍याची गाडी तासभर मिठाईच्या दुकानासमोर कचरा वाहतूक करणार्‍या गाड्यांची अवस्था पाहिली तरी रस्त्याने या गाडीमागे चालणेही नकोशे होते. अनेक प्रकारची घाण, उग्र दुर्गंधी, माशा या गाडीवर असतात. अशावेळी सदरच्या कचरा वाहतूक गाड्या मिठाईच्या दुकानासमोर तासन्तास उभ्या केल्या जातात. त्यामुळे ग्राहक या दुकानासमोर उभे राहण्याचेही टाळतात. संबंधित दुकानाच्या व्यवसायाला यामुळे मोठा फटका बसतो. गाडीचालकास गाडी बाजूला काठण्यास सांगितल्यास हुज्जत घातली जाते. त्यामुळे असे प्रकार थांबविण्याच्या सूचना प्रशासनाने ठेकेदाराला देणे आवश्यक आहे. त्रूटी दूर करून कचरा उचलण्याचे काम सुरू शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व त्रूटी दूर करून कचर्‍याचा प्रश्न मार्गी लावला जात असून, ठेकेदाराबरोबर महापालिकेची यंत्रणाही या कामात सहभागी करून घेतली आहे. त्यामुळे कचर्‍याच्या तक्रारी लवकरच संपतील, असे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळपर्यंत सर्व कचरा उचलणार- ठेकेदार महापालिकेने काही महिन्यांचे बील थकविले होते. त्यामुळे कचरा उचलणारे आणि वाहतूक करणार्‍या कर्मचार्‍यांनाही वेळेवर पैसे देता आले नाहीत. त्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी कर्मचार्‍यांनी अचानक कचरा उचलण्याचे काम थांबविले. त्यातून शहरात कचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला असून शनिवारी (दि. १५) सायंकाळपर्यंत शहरातील सर्व कचरा उचलण्यात येईल. सध्या दोन शिफ्टमध्ये हे काम चालू असून सदर प्रश्न मार्गी लावला जाईल, असे ठेकेदार संस्थेकडून सांगण्यात आले.