हातात तलवार घेवून ‘आयुर्वेद’जवळ दहशत

0
33

नगर – शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रोडवर रिमांड होम समोर हातात तलवार घेवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१४) रात्री १०.१५ च्या सुमारास पकडले आहे. राजेंद्र गोलासिंग टाक (वय ३१, रा. संजय नगर, काटवन खंडोबा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या आदेशान्वये त्यांच्या विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पो. हे.कॉ. सुयोग सुपेकर, पो.कॉ. सागर द्वारके हे शहर हद्दीत रात्र गस्त घालत असताना त्यांना उपअधीक्षक अमोल भारती यांनी फोन करून कळविले की, शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रोडवर रिमांड होम समोर एक इसम हातात तलवार घेवून मोठमोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करत येणार्‍या जाणार्‍या लोकांवर दहशत निर्माण करत आहे. तातडीने तेथे जावून कारवाई करा. हा आदेश मिळताच या पथकाने त्यांच्या मदतीला कोतवाली पोलिस ठाण्यातील पो.कॉ. तानाजी पवार, दिपक रोहकले, सुजय हिवाळे यांना बोलावून घेतले. या पथकाने रात्री १०.१५ च्या सुमारास तेथे जावून तलवार घेवून फिरणार्‍या राजेंद्र गोलासिंग टाक याला पकडून त्याच्या हातातून तलवार काढुन घेतली. त्याच्या विरुद्ध पो. कॉ. सागर द्वारके यांच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात शस्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.