नगर – दोघा भावांची शेजारी असलेली दोन किराणा मालाची दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यात ठेवलेली ४० हजारांची रोकड व १ पेन ड्राईव्ह असा ऐवज चोरून नेल्याची घटना कोठला परिसरात राऊत हॉस्पिटल शेजारी घडली. याबाबत टोनी नंदलाल खिलवानी (रा. सेंट विवेकानंद शाळेजवळ, तारकपूर) यांनी शुक्रवारी (दि.१४) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ दिनेश खिलवानी या दोघांची कोठला परिसरात राऊत हॉस्पिटल शेजारी गुरुकृपा स्टोअर्स व गुरुकृपा एजन्सी नावाची दोन होलसेल किराणा मालाची दुकाने आहेत. त्यांची दोन्ही दुकाने रविवारी बंद असतात. मात्र मागील रविवारी (दि.९) थोडा वेळ दुकाने उघडून दुपारी १ च्या सुमारास ते बंद करून दोघे भाऊ घरी गेले होते. सोमवारी (दि.१०) सकाळी १०.३० च्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दोन्ही दुकानात उचकापाचक केलेली दिसली. तसेच दुकानातील गल्ल्याचे लॉक तुटलेले दिसले. त्यांनी ते उघडून पाहिले असता गल्ल्यातील ४० हजारांची रोकड व १ १ पेन ड्राईव्ह असा ऐवज कोणीतरी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकानांची पाहणी केल्यावर चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत ही चोरी केली असल्याचे आढळून आले. याबाबत टोनी खिलवानी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ३८०, ४६१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.