शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे अमिष दाखवत नगरमध्ये एकाची ६६ लाखांची फसवणूक

0
81

नगर – शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर मधील व्यावसायिकाची १५ लाख ५५ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच एका सेवानिवृत्त व्यक्तीची अशाच पद्धतीने तब्बल ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत प्रकाश दत्तात्रय कुकडे (रा. शिवम विहार, शिंदे मळा, सावेडी) यांनी शुक्रवारी (दि.१४) दुपारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुकडे यांच्या व्हॉट्सअप वर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंग बाबत मेसेज आला होता. फिर्यादी यांनी याबाबत त्या महिलेकडून व्हॉट्सअप वर शेअर ट्रेडिंग बाबत अधिक माहिती घेतली. त्या महिलेने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर ट्रेडिंग मध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी रिचा सेठी या नावाच्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी तब्बल ६६ लाख ५५ हजार रुपये पाठविले. २० मार्च २०२४ ते १२ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर संपर्कही बंद झाला. दरम्यान त्यांना नफा मिळाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कमदेखील परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी रिचा सेठी नावाच्या अनोळखी महिलेवर भा.दं.वि.कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढल्या शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना नगर शहरासह जिल्ह्यात वाढू लागल्या आहेत. ४ दिवसांपूर्वीच नगरमधील व्यावसायिक राजीव अनंत सहस्त्रबुध्दे (वय ५३, रा. सिध्दीविनायक सोसायटी, सावेडी) यांची १५ लाख ५५ हजारांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. तसेच शेवगावमध्येही अशाच पद्धतीने अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली असून, त्यापैकी एक गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. अशा प्रकारे फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट देशभरात सक्रीय असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.