सुविधा द्या अन्यथा महापालिकेच्या कचरा डेपोला टाळे ठोकणार

0
92

बुरुडगाव ग्रामस्थांचा आयुक्तांना निवेदनाद्वारे इशारा; १९ जूनला बैठकीचे आयोजन

नगर – कचरा डेपोला ना हरकत प्रमाणपत्र देताना महापालिकेने बुरुडगाव ग्रामस्थांना दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता ५ वर्षात केलेली नाही. विशेषतः पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या अधिकारी, पदाधिकार्‍यांनी गावकर्‍यांना वेड्यात काढण्याचे काम केले असून, बैठकीत ठरलेल्या निर्णयाप्रमाणे प्रशासनाने लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत अन्यथा यापुढे महापालिकेशी कोणताही पत्रव्यवहार न करता कचरा गाड्या डेपोत जाऊ न देता डेपोला टाळे लावण्याचा इशारा बुरुडगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात माजी सरपंच बापूसाहेब कुलट (दि. यांच्यासह ग्रामस्थांनी शुक्रवारी १४) महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले. यावेळी बाजीराव शिंदे, नानाभाऊ मोढवे, भानुदास घोडके, सिताराम जाधव आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेला २०१९ मध्ये बुरुडगांव कचरा डेपोसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. इतिवृत्ताप्रमाणे पिण्याचे पाणी, पाईपलाईन, बुरुडगांव ते कचरा डेपोपर्यंत पाईपलाईन विद्युत पथदिवे, रस्ता, ड्रेनेज व दुतर्फा वृक्षारोपण करून देण्याचे ठरविले होते. यापैकी मनपाने कुठलीही सुविधा बुरुडगांवकरांना दिलेली नाही. कुठल्याही कामाची पुर्तता झालेली नाही. मनपाचे आयुक्त, आमदार, नगरसेवक, सर्व पदाधिकारी मिटिंगला उपस्थित होते. ५ वर्ष पुर्ण झाले तरी बुरुडगांवकरांना सुविधा पुरविल्या नाहीत. गावकर्‍यांना वेड्यात काढण्याचे काम केले आहे. एवढेच काय पण कचरा डेपोला आग लागली की लावली? याची कसून चौकशी होत नाही. बुरुडगावातील तसेच शहरातील जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही, परंतु मनपा डेपोला लागलेली आग विझविण्यासाठी मुळा डॅमच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे.

कचरा डेपोशेजारी अनेक शेतकर्‍यांच्या खार्‍या पाण्याच्या विहिरी आहेत, त्यांना विनंती केली तर अहोरात्र आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असते. वसंत टेकडीवरुन पाण्याची एक ट्रिप आणण्यासाठी एक ते दिड तास लागतो. शेतकर्‍यांना २०० रुपयेप्रमाणे ट्रिप दिली किंवा सिना नदीतून पाणी उपसले तर १२ तासाच्या आत डेपोला लागलेली आग विझवण्यास यश आले असते परंतु याचा विचार कुठलाही अधिकारी करत नाही. कचरा डेपोसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन स्वतःचे नातेवाईक, जवळचे पंटर यांना उद्योगधंदे चालविण्याकरिता दिले आहेत. बुरुडगावातील सर्व नागरिकांना वार्‍यावर सोडले आहे. पिसाळलेली कुत्रे, रानडुकरे याचा सर्व त्रास शेजारील शेतकर्‍यांना होत आहे. सावेडी डेपोत अधिकारी व पदाधिकारी यांना मलिदा मिळालेला आहे. संबंधित अधिकारी यांनी इतिवृत्ताप्रमाणे असलेली कामे लवकरात लवकर सुरु करावीत अन्यथा यापुढे मनपाला कुठलाही पत्र व्यवहार न करता कचरा डेपोला येणार्‍या कचरा गाड्या डेपोत न जाऊ देता डेपोला कुलुप लावण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात १९ जून रोजी दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्याच्या सूचना आयुत डॉ. जावळे यांनी उपायुत, सामान्य प्रशासन यांना दिले आहेत.