नगर – एसटी बसच्या वाहकाला मारहाण करून त्यांच्याकडील ए.टी.आय.एम. मशीन फेकून देत नुकसान केल्याची घटना नगर – मनमाड महामार्गावरील झोपटी कॅन्टीनसमोर घडली. संकेत सखाराम कोळेकर (वय २९, रा. शिरसमार्ग, ता. गेवराई, जि. बीड) असे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित प्रकाश सोनवणे (वय ३४, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोळेकर व त्यांचे सहकारी चालक पोपट चंदु केंगार हे त्यांच्या ताब्यातील सांगली ते शिर्डी ही बस (क्र.एमएम १४ बीटी ४७२७) घेऊन नगरमार्गे जात असताना झोपटी कॅन्टीनसमोर बस थांबवून वृध्द व्यक्ती उतरले.
झोपटी कॅन्टीनसमोरील घटना; एकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या ठिकाणी बस थांबून वृध्दाला उतरवल्याचे कारणावरून रोहित सोनवणे याने वाहक कोळेकर यांच्यासोबत हुज्जत घातली. शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली. धक्काबुक्कीकरून खाली पाडले. मारहाण करून तिकीट काढण्याचे ए.टी.आय.एम. मशीन हातातून ओढून बसमध्येच खाली फेकून नुकसान केले. दरम्यान हा प्रकार बसमधील इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी सोनवणेला मारहाण करून पकडून ठेवले. बस तारकपूर आगारात आणली व तोफखाना पोलिसांना फोन करून माहिती दिली. वाहक कोळेकर यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी सोनवणे विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.