महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत वैशाली बोरा व अंजली शिंगवी यांची बिनविरोध निवड

0
85

महिला राखीवच्या २ जागा बिनविरोध; सर्वसाधारण मधूनही तिघांची माघार 

नगर – भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या महिला राखीवच्या २ जागांसाठी दाखल असलेल्या ३ उमेदवारी अर्जांपैकी साधना विनोद पोखरणा यांनी शुक्रवारी (दि.१४) निवडणुकीतून माघार घेतल्याने या मतदार संघात वैशाली वर्धमान बोरा व अंजली नितीन शिंगवी यांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे. या बाबतची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. या शिवाय सर्वसाधारण मतदार संघातूनही तिघांनी माघार घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ मे पर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मात्र आता ही स्थगिती उठविण्यात आली असून, ७ जूनच्या शासन निर्णयानुसार ज्या संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आल्या होत्या त्या टप्प्यापासून निवडणुकांचे पुढील कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार महेश नागरी सहकारी पतसंस्था, भिंगार या संस्थेच्या नामनिर्देशन पत्र माघारीच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आलेला निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार १३ ते २७ जून या कालावधीत उमेदवारांना माघारीची मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची यादी २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संस्थेच्या सर्वसाधारण मतदार संघात १२ जागांसाठी १८ अर्ज दाखल आहेत. त्यातील बिपिनचंद्र बन्सीलाल लुणिया, प्रमोद माणचंद मुनोत, विनोद चंपालाल पोखरणा या तिघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता १२ जागांसाठी १५ जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. महिला राखीवच्या २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अनु. जाती जमातीच्या १ जागेसाठी २ अर्ज, इतर मागासवर्गीयच्या १ जागेसाठी २ अर्ज व वि.जा.भ.ज. किंवा विशेष मागास प्रवर्गच्या १ जागेसाठी ३ अर्ज शिल्लक आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे काम पाहत असून त्यांना संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र मेहेर हे सहाय्य करत आहेत.