खिस्तगल्लीत कारवाई; तलवार बाळगणारा निघाला रेकॉर्डवरील गुन्हेगार
नगर – वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणार्याला कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. शहरातील खिस्त गल्ली परिसरात मंगळवारी (दि.११) रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार करण कृष्णा फसले (रा. संगम चौक, खिस्त गल्ली) याच्या विरुद्ध याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मंगळवारी (दि.११) रात्री गोपनीय माहिती मिळाली की, खिस्तगल्ली येथे मुंजोबा मंदिरासमोर वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु असून रेकॉर्ड वरील गुन्हेगार करण फसले हा केक कापण्यासाठी तलवार घेवून आलेला आहे.
ही माहिती मिळताच पो.नि. दराडे यांनी पोलिस अंमलदार सुरज कदम, ए पी इनामदार, दिपक रोहकले, सुजय हिवाळे, तानाजी पवार, सत्यजित शिंदे यांना कारवाई साठी पाठविले. या पथकाने तत्काळ खिस्त गल्ली येथे जावून वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीने केक कापणार्या करण फसले यास पकडले. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली. याबाबत पो.कॉ.सुरज कदम यांच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात करण फसले याच्या विरोधात शस्त्र अधिनियम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.