नगर – मुंबईच्या घाटकोपर येथील बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेने नगर शहरात बेकायदेशीर होर्डिंग लावणार्यांच्या विरोधात आता कडक कारवाई सुरु केली आहे. शहरात आढळून आलेल्या २ बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी दोघांवर थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती क्र.२ (माळीवाडा) येथील लिपिक सुबोध विनायक देशमुख (रा. संदीप नगर, सारसनगर) यांनी बुधवारी (दि.१२) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उपेंद्र पब्लिसिटी कंपनीचे मदन जव्हेरी (रा. छत्रपती संभाजी नगर) व नाथलीला पब्लिसिटी कंपनीचे मिलिंद गजबे (रा. नागपूर) यांचे विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देशमुख व त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांना महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग शोधून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभाग समिती क्र. २ च्या पथकाने नगर-पुणे रोडवर ३० मे रोजी पाहणी केली असता त्यांना लेरा ब्रुस हायस्कूलजवळ २ लोखंडी होर्डिंग लावलेले दिसले. त्यावर अनधिकृत पणे फलक लावण्यात आलेले होते.
सदर होर्डिंग या पथकाने काढुन टाकले होते. सदर होर्डिंग महापालिकेची परवानगी न घेता कोणी लावले आहेत. याबाबत माहिती घेतल्यावर ते उपेंद्र पब्लिसिटी कंपनीचे मदन जव्हेरी (रा. छत्रपती संभाजीनगर) व नाथलीला पब्लिसिटी कंपनीचे मिलिंद गजबे (रा. नागपूर) यांनी लावल्याचे समोर आले. त्यानुसार अहवाल देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना सादर केला. त्यानंतर आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने देशमुख यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम १८८ सह महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.