नगर शहरासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले

0
82

ससेवाडी, उदरमल परिसरात झाला ढगफुटीसदृश्य पाऊस, सीना नदीला पुर 

नगर – नगर शहरासह परिसराला बुधवारी (दि.१२) दुपारी आणि सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. नगर तालुयातील ससेवाडी तसेच उदरमल परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. सीना नदीला पूर आला होता. जेऊरच्या बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. परिसरातील बंधारे या पावसाने तुडुंब भरले आहेत. तालुयातील ससेवाडी व उदरमल पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील बहुतांशी बंधारे तुडुंब भरले आहेत. तर अनेक लहान मोठ्या तलावांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सीना नदीला आलेल्या पुराचे पाणी जेऊरगावच्या बाजारपेठेत शिरले होते. सीनेच्या पुराचे पाणी संतुकनाथ विद्यालया जवळील पुलावरून वाहत असल्याने नाईक मळा, तोडमल वस्ती येथील नागरिकांचा काही काळ गावाशी संपर्क तुटला होता. उदरमल परिसरातील दरा येथील रस्ता पावसाने वाहून गेला आहे. ससेवाडी, उदरमल परिसरातील शेतकर्‍यांचे बांध वाहून गेले आहेत. सीना नदीवरील सर्वच बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे. जेऊर पंचक्रोशीतील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार्‍या पिंपळगाव माळवी तलावात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. जेऊर पट्ट्यात सलग चार दिवसापासून पाऊस होत असून शेतकरी पेरणीसाठी वापसा होण्याची वाट पाहत आहे परंतु सतत पसरणार्‍या पावसामुळे पेरणी करण्यास विलंब होत आहे. तालुयामध्ये सर्व दूर पाऊस झाल्याने वापसा होताच शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे.

नगर शहर परिसरात मंडल निहाय झालेला पाऊस
नालेगाव – ३५.३ मिमी, सावेडी १२.८ मिमी, कापूरवाडी – ३५.३
मिमी, केडगाव – ८.८ मिमी, भिंगार २५.८ मिमी, नागापूर – १३.३ मिमी,
जेऊर – ४२ मिमी, चिचोंडी – १४.३ मिमी, वाळकी – ४६.५ मिमी,
चास – ४५.५ मिमी, रुई छत्तीसी – ४६.५ मिमी.