नगर – जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते, बियाणे व कीटकनाशक यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकर्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० किंवा ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तसेच नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करून तातडीने तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, निविष्ठाची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकर्यांना अडचणीत आणणार्या कृषी सेवा केंद्र यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असुन या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या नियम व अटीचे पालन करावे. शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरवठा वेळेत आणि रास्त भावात करून द्यावा. सर्व निविष्ठाचा साठा व भावफलक दैनंदिन दुकानाबाहेर शेतकर्यांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे आणि खते भावफलक व साठाफलक लावलेला नसेल अशा सर्व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.