नगर शहर व परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरूच

0
83

तासन्तास वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त 

नगर – पावसाळा सुरू झाल्यानंतर शहर आणि परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला असून, तासन्तास वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेच्या समस्येबाबत तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आपत्तीच्या काळातही अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून, विजेचा लपंडाव तातडीने थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पावसाळ्यात विजेची समस्या निर्माण होते हे जगजाहीर आहे.

मात्र ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही हालचाली होत नाहीत किंवा नियोजनही केले जात नसल्याचे स्पष्ट आहे. वादळ, वारा नसला तरीही वीजपुरवठा तासन्तास खंडीत केला जातो. नागरिकांनी कंपनी आणि अधिकार्‍यांच्या नंबरवर फोन केल्यास ते उचलले जात नाहीत आणि उचलले तरी थातूर-मातूर उत्तरे देऊन टाळाटाळ केली जाते. रात्री-अपरात्री आणि दिवसभरात केव्हाही, कोणत्याही भागात, कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात आहे.