नगर – अवैधरित्या तलवारी जवळ बाळगून त्याद्वारे परिसरात दहशत निर्माण करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. राहाता, नेवासा व श्रीरामपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन अवैध अग्नीशस्त्रे, घातक हत्यारे वापर, वाहतुक, विक्री व बाळगणे या सारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याकरिता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेरयांच्या सह नगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध शस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन आवश्यक कारवाई करणे सुचना दिल्या होत्या.
पो.नि.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, विशाल दळवी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, सचिन अडबल, संदीप चव्हाण, रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ व उमाकांत गावडे अशा अंमलदारांची ३ वेगवेगळी पथके नेमली होती. सदर तिन्ही पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील ३ इसमांविरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जातुन १६ हजार रुपये किंमतीच्या ३ तलवारी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये राहुल शिवाजी इंगळे (वय २४, रा. इंदीरानगर, पुणतांबा, ता. राहाता) याच्या विरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात, शेखर दादासाहेब आहिरे (वय ३१, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) याच्या विरोधात नेवासा पोलिस ठाण्यात तर राधाकिसन गणपत जाधव (वय ४५, रा. राजणखोल, ता. राहाता) याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.