नीट परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी

0
86

अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगरमध्ये निषेध आंदोलन

नगर – राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीएच्या वतीने घेण्यात आलेल्या निट २०२४ च्या परिक्षेत झालेल्या घोटाळ्याचा निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नगर शहरातील दिल्लीगेट येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. सदर परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी. अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एनटीएच्या महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट परिक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण देण्यात आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्यात आलेले आहेत. परिक्षेचा पेपरफुटीच्या घटनाही घडलेल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे एनटीएच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात एनटीएने परिक्षेबाबत काही सुधारणा करणे आवश्यक असून झालेल्या नीट परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. दोषी आढळणार्‍या अधिकारी पदाधिकार्‍यांवर कारवाई करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत परिक्षार्थींची समूपदेशन प्रक्रिया थांबवावी, झालेल्या काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये अनियमिततेबाबत एनटीएने स्पष्टीकरण द्यावे. भविष्यातील परिक्षांमध्ये होणार्‍या घोटाळे किंवा पेपरफुटीच्या घटना थांबविण्यासंदर्भात सुरक्षेचा प्रोटोकॉल निश्चित करावा तसेच परिक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने पुढील होणार्‍या परिक्षा या सरकारी संस्थांमध्येच आयोजित करण्यात याव्यात. परिक्षेपासून ते निकालापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आदी मागण्यांबाबत गंभीर दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.