नगरमधील विजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा धरणे आंदोलन करणार

0
113

भाजपा युवा मोर्चाचे महावितरणला निवेदन 

नगर – पाऊस सुरू झाल्यापासून नगर शहरात दिवस रात्र विजेचा लपंडाव चालू असतो तो त्वरित थांबवा, असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयात कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कुमावत यांना देण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, उपाध्यक्ष अजित कोतकर, विशाल शितोळे, आदेश गायकवाड, अमोल थोरात, श्रेयस नराल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. रात्री अपरात्री विजेचा पुरवठा खंडित होऊन वीजपुरवठा लवकर सुरळीत होत नाही नगर शहरात महावितरणला फोन लावला असता फोन उचलला जात नाही, यामुळे शहरातील नागरिकांना अतोनात मानसिक त्रास सहन करावा लागतो. तरी यावर लवकर उपायोजना करून नागरिकांना त्रास मुक्त करावे. जर यावर कार्यवाही केली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेल असा इशारा मयूर बोचुघोळ यांनी दिला आहे.