नगर – अपूर्ण कामामुळे आणि वाहतूक सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना न केल्या मुळे बायपास रस्त्यावर अरणगाव शिवारात मंगळवारी (दि.११) सकाळी दोन वाहनांचा भीषण अपघात झाला, या अपघाताला आणि सातत्याने होत असलेल्या अन्य अपघातांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीचा निष्काळजी पणा कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांच्या सह अरणगाव ग्रामस्थांनी बायपास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम अनेक ठिकाणी संथगतीने सुरु असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने रस्ते वाहतूक सुरक्षेसाठी कसल्याही उपाययोजना न केल्याने, दिशादर्शक फलक न लावल्याने या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु असून मंगळवारी (दि.११) सकाळी २ वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातातून वाहन चालक सुदैवाने बचावले असले तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निषेधार्थ संदेश कार्लेंसह अरणगाव ग्रामस्थांनी केला रास्ता रोको
अरणगाव जवळ रेल्वे उड्डाणपूल संपल्यावर तेथून काही लांब अंतरापर्यंत चौपदरी मार्गा ऐवजी अचानक दुपदरी मार्ग सुरु होत असल्याने हे अपघात होत आहेत. ठेकेदार संस्थेने या बायपास वर कोठेही एकेरी मार्ग, दुहेरी मार्ग, दिशादर्शक फलक न लावल्याने अपघातांची संख्या वाढत असून ६ जून रोजीही राहुरी येथील २ तरुणांचा या ठिकाणी अपघात होवून त्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे संदेश कार्ले म्हणाले. आजचा अपघात झाल्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी आक्रमक भूमिका घेत गावकर्यांसहरास्ता रोको आंदोलन सुरु केले. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी दिशदर्शक फलक, सेच सर्व्हिस रोड, उड्डाणपुलावरील दौंड रोडला उतरणारा रस्ता करत नाहीत,तो पर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरु होवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी श्री. पाटणकर तसेच ठेकेदार जीएचव्ही कंपनीचे श्री. पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कर्मचार्यांच्या मार्फत रस्ता दुभाजक तोडून संदेश कार्ले व ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे काम करून दिले व दिशदर्शक फलक लगेच लावण्याचे मान्य केल्यावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.