सावेडी उपनगरात पुन्हा दोन घरे चोरट्यांनी फोडली; सोन्याचे दागिने व रोकड पळवत पोलिसांना आव्हान

0
61

नगर – शहरातील सावेडी उपनगरात चोर्‍या घरफोड्यांचे सत्र सुरूच असून या अगोदर झालेल्या घरफोड्यांचा तपास लागलेला नसताना आणखी २ बंद घरे चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी (दि.१०) तोफखाना पोलिस ठाण्यात २ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोर्‍या – घरफोड्या होत असल्याने आणि त्यांचा तपास लागत नसल्याने तोफखाना पोलिसांपेक्षा चोरट्यांचेच ’नेटवर्क स्ट्राँग’ झाले असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. घरफोडीचा सोमवारी दुपारी दाखल झालेला पहिला गुन्हा सिद्धार्थनगर परिसरातील म्युनिसीपल कॉलनीत रविवारी (दि.९) सायंकाळी ७.३० ते ८.१० या कालावधीत घडला आहे. या ठिकाणी राहणारे आकाश प्रकाश सितापुरे हे कुटुंबियांना घेवून घराला कुलूप लावून बालिकाश्रम रोड वरील खानावळीत गेले होते. ते घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आतमध्ये जावून पाहणी केली असता घरात सर्वत्र उचकापाचक झालेली दिसून आली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत उचकापाचक केली व घरातील ५६ हजार ५०० रुपयांची रोकड व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे.

याबाबत आकाश सितापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चोरीची दुसरी घटना सिव्हील हडको परिसरातील तुळजा भवानी मंदिराशेजारी, गणेश चौक येथे सुनिता हरी नागरगोजे यांच्या घरात घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी दि. ३ जून ते दि.७ जून रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरातील लोखंडी कपाटातील एका डब्यात ठेवलेले त्यांचे व त्यांच्या मुलीचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. चोरीची घटना निदर्शनास आल्यावर नागरगोजे यांनी सोमवारी (दि.१०) सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.