नगर – कार्यालयात उशीरा येणार्या ‘लेटलतिफ’ आणि नियमांचे पालन न करणार्या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचार्यांवर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कारवाईचा दंडूका उगारला आहे. महापालिका मुख्यालयातील एकूण १५५ कर्मचार्यांपैकी तब्बल १२२ कर्मचार्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करतानाच त्यांना कारणे दाखवा नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त आणि विभागप्रमुखही आयुक्तांच्या कारवाईतून सुटलेले नाहीत.
वरिष्ठ अधिकार्यांसह तब्बल १२२ ‘लेटलतिफ’ आले आढळून, आर्थिक दंडासह सर्वांना कारणे दाखवा नोटीस
आठवड्याच्या दुसर्याच दिवशी मंगळवारी (दि. ११) डॉ. पंकज जावळे सकाळी ९.३० वा. मुख्यालयात हजर झाले. त्यांनी कार्यालयांची तपासणी केली असता अवघे १६ कर्मचारी वेळेत हजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खुर्ची मांडून कर्मचार्यांची झाडाझडती घेतली. सर्व हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन उशीरा येणार्या कर्मचार्यांना विचारणा केली. सर्व कर्मचार्यांना धारेवर धरत ऑफिसचा टाईम किती आहे हे विचारात होते. शिपाई यांना साडेनऊ तर अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही, हे पाहताच आयुतांंचा पारा चढला व प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची हजेरी घेत चांगलेच खडेबोल सुनावले व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच प्रत्येक कर्मचार्याकडून साडेदहा वाजल्यानंतर आल्याबाबतचे कारण लेखी घेण्यात आले.
या झाडाझडतीत तब्बल १२२ कर्मचारी ‘राजामहाराजा’च्या रूबाबात कार्यालयात येत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये अति. आयुक्त, सर्व उपायुक्त, सहआयुक्त आणि विभागप्रमुखही कार्यालयीन वेळा पाळत नसून उशीरा येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी अधिकारी-कर्मचार्यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उशीरा येणार्या अधिकारी-कर्मचार्यांना १ हजार रुपयांचा आर्थिक दंड तसेच कारणे दाखवा नोटीसा बजाविल्या आहेत. आयुक्तांच्या या कारवाईने कर्मचार्यांमध्ये धडकी भरली आहे. तथापी या कारवाईनंतरही अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळा पाळतात का? ते पुढच्या काळात दिसून येईल.