जमीन खरेदी व्यवहारात केला विश्वासघात; ६ जणांवर गुन्हा दाखल
नगर – जमीन खरेदी २५ लाख रुपये घेत साठेखत करून दिले मात्र ते साठेखत रद्द न करता आणि घेतलेले २५ लाख रुपये परत न करता सदर जमिनीची अन्य एकाला विक्री करून ६ जणांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नगर शहर प्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते (वय ४९, रा. भूषणनगर, केडगाव) यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सातपुते यांनी सोमवारी (दि.१०) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे, राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व रा. संगम जळगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपीतांची नगर तालुयातील कामरगाव येथे गट नंबर ६९६ मध्ये १९ एकर शेत जमीन असून या जमीनीच्या खरेदी व्यवहाराबाबत फिर्यादी सातपुते यांच्या सोबत बोलणे झाले होते.
व्यवहार करण्याचे निश्चित झाल्यावर आरोपींनी फिर्यादी सातपुते यांना जमिनीचे साठेखत करून दिले. त्या पोटी सातपुते यांनी त्यांना २५ लाख रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपींनी फिर्यादी सातपुते यांना करून दिलेले साठेखत रद्द न करता व त्यांनी दिलेली २५ लाखांची रक्कम परत न करता त्यांचा विश्वासघात करून सदर शेत जमीन दि. ३ एप्रिल २०२४ रोजी नगरमधील दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २ येथे परस्पर खरेदी खत दस्त नं. ३५४६/२०२४ अन्वये राकेश कुमार सिंग (रा. अर्जुन पार्क, श्रद्धा विहार, इंदिरा नगर, नाशिक) यांचे जमीनीचे मूळ मालक म्हणून अंकुश बाळू ठोकळ (रा. कामरगाव, ता.नगर) यांना विकली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ६ जणांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीवास्तव या करत आहेत.