निंबळक – रेल्वेगेट ते इसळक आणि निंबळक ते निमगाव फाटा रस्ता हा खुप वर्दळीचा रस्ता असून दिवस – रात्र या रस्त्यानेच बहुसंख्य लोक ये- जा करत असतात. या रस्त्याची अवस्था खुपच खराब झालेली असून मोठ- मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वार घसरून पडलेले आहेत. सर्व वाहनचालक या खड्ड्यांतून वाहन चालवताना त्रस्त होत आहेत. या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक असून, त्याबाबतचे निवेदन सा. बां. विभागाचे उपविभागीय अधिकारी के. एम. डोंगरे यांना देण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून मागणी केली जात असूनदेखील सदर विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पावसामुळे तर आता अजुनच बिकट स्थिती निर्माण झाल्याने तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगर पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निंबळक शिवसेना शाखाप्रमुख बी. डी. कोतकर, संदिप गेरंगे, सहदेव लांडे, संतोष गेरंगे, पोपट गाडगे, विकास शेळके, निलेश पाडळे आदी उपस्थित होते.