सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कमेसह दीड लाखांचा ऐवज लंपास
नगर – नगर शहरातील घराला कुलूप लावून कामावर गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम वमहत्वाची कागदपत्रे असा १ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना काटवन खंडोबा परिसरातील संजय नगर येथे सोमवारी (दि.३) सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत मुन्नी देवी रामकुमार केवट (रा. जाधव मळा, संजय नगर, काटवन खंडोबा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या सोमवारी (दि.३) सकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून कामावर गेल्या होत्या. त्या सायंकाळी ५ च्या सुमारास घरी परतल्या असता त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी बंद घर फोडून आतील कपाटात उचकापाचक केली व सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे असा १ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो. नि. जानकर, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.