शोरूममधून पैसे न देता ट्रॅटर घेवून जात केला विश्वासघात

0
55

६ लाख ३० हजारांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

नगर – ट्रॅटरच्या शोरूम मालकाचा विश्वास संपादन करून फायनान्स कंपनीचे लोन करून पैसे देतो असे सांगून शोरूम मधून नवीन ट्रॅटर घेवून जात वर्ष उलटले तरी ६ लाख ३० हजारांची रक्कम न देता तसेच कुठलेही फायनान्स लोन न करता शोरूम मालकाचा दोघांनी विश्वासघात केल्याची घटना नगरमध्ये समोर आली आहे. याबाबत नगर – कल्याण रोडवरील ड्रीम सीटी समोर असलेल्या साईकृपा ट्रॅटर्स या शोरूमचे मालक हेमंतकुमार अरुण ठुबे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या साईकृपा ट्रॅटर्स या शोरूममध्ये मागील वर्षी मे महिन्यात ज्ञानेश्वर हिरामण पवार (रा. वैजापूर) व अनिल जाधव (रा.वळण, ता. राहुरी हे दोघे आले. त्यांनी नवीन ट्रॅटर घ्यायचा असल्याचे सांगितले. त्या पूर्वी अनिल जाधव याने एक ट्रॅटर या शोरूम मधून घेवून जात त्यावर फायनान्स कंपनीचे लोन करून त्या ट्रॅटरचे सर्व पैसे फिर्यादी ठुबे यांना दिले होते.

त्यामुळे जाधव व ठुबे यांची चांगली ओळख झालेली होती. त्यामुळे ठुबे यांनी आरोपी ज्ञानेश्वर हिरामण पवार यांना ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅटर दाखवला. त्यासाठीचे १ लाख २० हजारांचे डाऊन पेमेंट व आवश्यक कागदपत्रे त्यांनी शोरूम मालक ठुबे यांना दिले. तसेच एल अँड टी फायनान्स कंपनीचे लोन करून उर्वरित रक्कम देवू असे सांगून ट्रॅटर घेवून गेले. त्यानंतर वर्षभर त्या दोघांना ठुबे यांनी पैशांसाठी संपर्क साधला मात्र त्यांनी राहिलेले ६ लाख ३० हजार ही दिले नाही आणि फायनान्स कंपनीचे लोनही केले नाही. आपला या दोघांनी विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यावर ठुबे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा आरोपींच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.