मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणार्‍या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील चेन पळवल्या

0
101

एका चोरट्याला काहींनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

नगर – एमआयडीसी परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटांवर आणि गळ्यातील सोन्याच्या चेनवर चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. एका चोरट्याला काही कार्यकर्त्यांनी चोरी करताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मंगळवारी (दि.४) शिर्डी आणि नगर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिर्डीतून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे व नगरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हे विजयी झाल्याच्या घोषणा निवडणूक अधिकार्‍यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेवर केल्यावर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला. या गर्दीत काही चोरटेही घुसले, त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटे गर्दीत चोरली. तर अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनही चोरल्या. त्यातील एका चोरट्याला काहींनी चोरी करताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

राजेंद्र वसंत शिंदे (रा. पाथर्डी) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी करत त्याची अंगझडती घेतली, मात्र त्याच्याकडे कुठलाही मुद्देमाल मिळून आलेला नाही. त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करणार असून पोलिस कोठडीत त्याच्याकडे त्याच्या इतर साठीदारांबाबत माहिती घेणार असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी सांगितले. दरम्यान याबाबत सचिन मोहन शिंदे (रा. सप्रे मळा, बोल्हेगाव फाटा) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मतमोजणी केंद्राबाहेर गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन व अन्य एका जणाची २ तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली असल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.