५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने केले हस्तगत
नगर – नगर शहर व परिसरात घरफोड्या करणारी सराईत गुन्हेगारांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या टोळीकडून चोरलेले ५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. किशोर तेजराव वायाळ (वय ४२, रा. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय ३७, रा. शिरसवाडी, जालना), विष्णु हरिश्चंद्र हिंगे (वय ३२, रा. चंदनझिरा कॉलनी, जालना) अशी या आरोपींची नावे आहेत. बालिकाश्रम रोडवरील बोरुडे मळा येथील अमृत कलश रेसिडेन्सीमध्ये राहणारे रखमा बालाजी सुंबे हे २५ मे रोजी त्यांच्या घरास कुलुप लावून कामानिमित्त बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन कपाटातील ६६ हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या वारंवार घटना घडत असल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमून तपास सुरु केला. या पथकाने जिल्ह्यातील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेटी देवून घटनाठिकाणचे आजुबाजुस असलेले सीसीटीव्ही फुटेज संकलित करुन सदरचे फुटेज हे महाराष्ट्र राज्यामध्ये आरोपींची ओळख पटविणेकामी प्रसारित केले होते.
त्यानुसार सदर फुटेजमधील एक आरोपी हा किशोर तेजराव वायाळ हा असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना सोमवारी (दि.३) सदर आरोपी हा त्याचे साथीदारासह नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची माहिती पथकाला मिळाली. या पथकाने पाईपलाईन रोड ते वडगांव गुप्ता गावाकडे जाणारे रोडवरील बागेजवळ सापळा लावुन तिघांना शिताफीने ताब्यात घेतले आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार रुद्राक्ष पवार पुर्ण नांव माहिती नाही. रा. लाखनवाडा, ता. खामगांव, जि. बुलढाणा (फरार) याचे सोबत नगर, नेवासा, चाळीसगांव, पैठण, या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अहमदनगर, जळगांव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी किशोर तेजराव वायाळ याच्यावर घरफोडीचे ५० गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी विष्णु हरिशचंद्र हिंगे याच्याविरुध्द ६ गुन्हे, आरोपी गोरख रघुनाथ खळेकर याचेविरुध्द १८ गुन्हे विविध जिल्ह्यांत दाखल आहेत.