सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम पळविली
नगर – नगर शहरातील फ्लॅटला कुलूप लावून शेतीच्या कामानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या नोकरदाराचा बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील रासनेनगर येथे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत अरुण काशिनाथ पंधरकर (रा. फ्लॅट क्र.१, प्रणव रेसिडेन्सी, रासनेनगर, सावेडी, मूळ रा. पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पंधरकर हे दि. ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता फ्लॅटला कुलूप लावून शेतीच्या कामानिमित्त कुटुंबासह गावी पिंपळगाव पिसा येथे गेले होते. ते पुन्हा सोमवारी (दि.३) सकाळी १० च्या सुमारास नगरला आले असता त्यांना फ्लॅट मध्ये चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून आतील कपाटात उचकापाचक केली व सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रेचोरून नेली. असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.