रात्रीच्या वेळी खिडकीतून घरात घुसून केली घरफोडी

0
69

नगर – रात्रीच्या वेळी खिडकीतून घरात घुसून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात स्वस्त धान्य दुकानाशेजारी असलेल्या गणपती मंदिराजवळ सोमवारी (दि.३) पहाटे १.३० ते ४ या कालावधीत घडली. याबाबत सौ.तेजल अजय खरात यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने सोमवारी (दि.३) पहाटे १.३० ते ४ या कालावधीत घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक केली आणि त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि एक मोबाईल असा ऐवज चोरून नेला.

फिर्यादी व कुटुंबीय पहाटे झोपेतून उठल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जावून पाहणी केली. याबाबत खरात यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.